शुक्रवार, २७ मे, २०१६

आठवणीतील माणसं : मधु शेट्ये . ....


आठवणीतील माणसं : मधु शेट्ये . . . . . .





जूनी माणसं किती गोड, अन चिवट असत. यावरून मला आज प्रकर्षाने मधु शेट्ये यांची खूप खूप आठवण येऊ लागली. हा माणूसच तसा होता. आम्हाला सोडुन गेले असले तरी प्रत्यक्षात मात्र आजही आमच्या सोबत आहेत असेच वाटते.कुठून तरी आपली कापडी पिशवी हलवित हलवित येईल असं राहून राहून वाटतं. 
पण मधु शेट्ये म्हटले तरी डोळ्यात टचकन अश्रू दाटून येतात. साचणार्या आसवांना वाट मोकळी करावी यासाठी आठवणीतील माणसं कै. मधु शेट्ये यांच्यासाठी दोन शब्द........

मधु शेट्ये म्हणजे वरिष्ठ असले तरी मात्र मी मोठा आणि तु छोटा हा भेदभाव कधीही जोपासला नाही. त्यांच्या हसण्यात आत्मियता, विश्वास आणि दिलासा दिसे त्यामुळे समोरचा माणूस त्यांच्या साध्या हसण्याने तृप्त होत असे. आपण लहाण होऊन समोरच्यांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण करणारा त्यांचा स्वभाव. लहान मुलांबरोबर कॅरम खेळताना कोणी चिटींग केली तर लहान मुलांप्रमाणे भांडण करणारी बाल्यावस्था जोपासली होती. आम्ही भुवईची भाषा यांजकडून शिकलो. गोपनिय मसले ते नेहमी भुवईनी बोलायचे आम्ही तर डोळ्यांनी प्रतिसाद देत होतो. 
वाटले नव्हते इतक्या लवकर ते मार्गस्थ होतील.मृत्युशय्येवर चिवट झुंज देत देत साखरेपेक्षा गोड असणार्या या सुस्वभावी माणसाने एक दिवस कोरड्या ठाक वाटणार्या बटबटीत डोळ्यात उतरून आलेला ओलावा निरोप घेत घेत एका वळणावरती थांबला. अखेरचा तो दिवस ....... मुंबई पोर्ट ट्रस्ट रूग्णालयात मी त्यांच्याजवळ उभा होतो. शेवटचे ते काही क्षण ....... त्यांच्या पायातील भळभळणार्या जखमांना औषधाने धुत्कारले होते. कुटुंब औदासिन सावटाखाली खिन्न होऊन मृत्युंजय मंत्र जपत बाहेर बसले होते. 
इकडे शरीर हळूहळू शिथिल होत चालले होते. अगदी चेतनाहीन..... डोळ्यांत हालचाल मंदावलेली असली तरी माझ्याकडे एकटक पाहत होते . डोळे बोलत नसले तरी भुवया काही तरी सांगत होत्या माझं मलाच गहिवरून आले. कितीतरी सखे सोबती सोडून गेले पण अश्रूनी कधी डोळे पाणावलेले नव्हते पण या निपचित पडलेल्या मधु शेट्येंनी माझ्यातल्या गंगा यमुनांना पूर आणला होता. त्याक्षणी त्यांच्या कुटुंबियांना सावरण्याऐवजी मलाच सावरण्याचा प्रयत्न झाला. असे आपले मधु शेट्ये............

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा